निलंगा बस डेपोचे वेळापत्रक पूर्णपणे ढासळले; प्रवाशांचा प्रचंड मनस्ताप, प्रशासनाविरोधात संतापाचा स्फोट
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
लातूर : निलंगा बस डेपोची प्रवासी सेवा अक्षरशः कोलमडली असून वेळापत्रकाचा थोडा नाही तर पूर्ण बोजवारा उडाला आहे. दररोज निर्धारीत वेळेवर बस न सुटणे, काही बस मार्गातच गायब होणे, तर काही बस थेट इतर मार्गावर वळवणे या सर्व प्रकारांनी प्रवाशांचा संयम तुटला आहे.
डेपो व्यवस्थापनाच्या निष्क्रियतेमुळे प्रवासी आज अक्षरशः “..... भरोशावर” प्रवास करत आहेत.
प्रवाशांनुसार, कोणत्या बसला किती वेळ लागणार, ती कोणत्या मार्गावर जाणार, चालक आला का नाही याचा कोणालाच पत्ता नसतो. वाहतूक नियंत्रकांकडून मिळणारे उत्तर एकच: “बस येईल… थांबा.”ही बेफिकीर भूमिका पाहून नागरिकांनी स्पष्टपणे आरोप केला आहे की निलंगा डेपोचे व्यवस्थापन पूर्णपणे बिनधास्त स्थितीत आहे.
या ढिसाळ कारभाराचा तात्काळ फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे.
विद्यार्थी गाड्या न मिळाल्यामुळे उशिरा शाळा–कॉलेजात पोहोचत आहेत
महिलांना थांब्यावर तासन्तास प्रतीक्षा
शेतकरी आणि मजुरांचे काम विस्कळीत
रुग्णांना वेळेत इस्पितळात जाणे कठीण
बस सेवेसारख्या मूलभूत सुविधेत हा गोंधळ सुरू असेल, तर ग्रामीण भागातील जनतेची अडचण किती गंभीर आहे, हे सहज दिसून येते.
प्रवाशांचा थेट प्रश्न “हा डेपो नेमका चालवतो कोण?”
निलंगा–बसपूर, निलंगा–उमरगा, निलंगा–औराद, निलंगा–लातूर यांसह सर्व मुख्य मार्गांवर बस वेळापत्रक तालबद्ध राहिलेलेच नाही.
चालक–वाहक वेळेत अनुपलब्ध का?
वेळापत्रक कोण पाहतो?
डेपो प्रशासन नेमके करतं तरी काय?
या प्रश्नांची उत्तरे कोणाकडेच नसल्याने डेपोकडे "व्यवस्था आहे का नाही" या प्रश्नावरच जनतेत चर्चा सुरू आहे.
संतप्त प्रवाशांचा इशारा – “रास्ता रोको, डेपो बंद आंदोलन अपरिहार्य”
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या गोंधळामुळे प्रवाशांचा राग टोकाला पोहोचला आहे.
“आता निर्णय घ्या; अन्यथा आम्हीही कठोर पाऊल उचलू,” असा थेट इशारा प्रवाशांनी प्रशासनाला दिला आहे.
बस वेळापत्रक निश्चित करून त्वरित सुरळीत केले नाही, तर गावागावातून रास्ता रोको, डेपो बंद आंदोलन पेट घेईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
एमएसआरटीसीला जाग येणार तरी कधी?
प्रवासी सेवा ही राज्य परिवहनची सर्वात मूलभूत जबाबदारी. तरीही निलंगा डेपोच्या अकार्यक्षमतेने प्रवाशांचे दैनंदिन जीवन त्रस्त झाले आहे.
यावर तातडीने सुधारणा न झाल्यास “जवाबदार कोण?” या प्रश्नावर मोठा वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत.


0 Comments