युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लातूरकरांची अश्रुपूर्ण आदरांजली
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
मिलिंद कांबळे
लातूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लातूर शहरात आज अत्यंत वेदनादायी, स्तब्ध आणि भावपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले. बहुजन समाजाच्या उद्धाराचे महाकार्य करणाऱ्या या युगपुरुषाच्या स्मृतीदिनी हजारो अनुयायांनी उत्स्फूर्तपणे शहरभर उपस्थित राहून आदरांजली वाहिली. सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
पहाटेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात समितीकडून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर महामानवांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले. परिसरात ‘बाबासाहेब अमर रहे!’ या घोषणांचा प्रचंड निनाद झंकारत राहिला.
यानंतर भिक्खू संघाच्या उपस्थितीत त्रिसरण–पंचशील देण्यात आले.
या वेळी भिक्खू पय्यानंद थेरो म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे खरे राष्ट्रनिर्माते होते. ६९ वर्षांपूर्वी त्यांच्या महापरिनिर्वाणाने भारताने विचारांचा महासूर्य गमावला. शोषित-वंचितांना स्वाभिमान आणि हक्काची ओळख देणारा असा महामानव इतिहासात क्वचितच जन्माला येतो. आजही संविधान आणि बुद्धधम्म हीच आमच्या संघर्षाची आणि उभारीची शिदोरी आहे.”
कार्यक्रमादरम्यान दोन मिनिटे शांतता पाळून महामानवांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहरात अनेक ठिकाणी अनुयायांची गर्दी आणि भावनिक वातावरण पाहायला मिळाले.
या वेळी भंते बोधिराज, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, शिक्षक आमदार विक्रम काळे, युवा नेते अजित पाटील कव्हेकर, समिती अध्यक्ष सुशीलकुमार चिकटे, डी.एस. नरसिंगे, प्रा. डॉ. संजय गवई, भीमराव चौदंते, अनंत लांडगे, मोहन माने, चंद्रकांत चिकटे, राहुल कांबळे, ज्योतिराम लामतुरे, केशव कांबळे, विनय जाकते, वैभव गायकवाड, डॉ. विजय अजनिकर, चिंटू गायकवाड, डी. उमाकांत, निखिल गायकवाड, करण ओव्हाळ, राहुल शाक्यमुनी, सचिन गायकवाड, अॅड. रोहित सोमवंशी, डॉ. जितेंद्र वाघमारे, सिद्धांत चिकटे, मिलिंद धावारे, सुजाता अजनिकर, पंचशीला बनसोडे, विद्या ससाणे, सुनीता सोनकांबळे, निर्मला मधाळे, सुमन उडानशिव आदींसह शहरातील प्रतिष्ठित मान्यवर, डॉक्टर, वकील, महार बटालियनचे आजी-माजी सैनिक व बौद्ध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 Comments