तेरणा नदीच्या पुलावर शेतकऱ्यांचा चार तास रास्ता रोको, दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर : मुसळधार पावसामुळे व तेरणा नद्यांना आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, या मागणीसाठी उमरगा, लोहारा, औसा व निलंगा या चार तालुक्यांतील शेतकऱ्यांनी लातूर उमरगा राष्ट्रीय महामार्गावर चार तालुक्याच्या सीमेवरील तेरणा नदीवरील पुलावर बुधवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
दुपारी एक वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत चाललेल्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर शेतकरी, महिला व नागरिक सहभागी झाले होते.
पूरामुळे शेतजमिनी खरडून गेल्या असून जनावरे व पिके पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सोयाबीनला बाजारात प्रती क्विंटल फक्त पस्तीसशे रुपये भाव दिला जात आहे, मात्र त्याच सोयाबीनची तीस किलोची पिशवी शेतकऱ्यांनाच आडीच हजार रुपयांना विकली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तेरणा नदीपात्रात दोन किलोमीटर पाणी साचले आहे. एक हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली आहेत त्याचा पीक कापणी अहवाल कसा देणार.
शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्यांमध्ये
गेल्या वर्षी अनुदान तेरा हजार रुपये होते. यावर्षी आठ हजार रुपये का देत आहात. गुंठामागे ८० रुपयांच्या अल्प मदतीऐवजी सरसकट एकरी ५० हजार रुपये अनुदान, शंभर टक्के पीकविमा तातडीने मंजूर करणे, तसेच मुख्यमंत्र्यांसोबत तातडीने बैठक लावण्याची मागणी केली.
यादरम्यान आंदोलकांनी औसाचे आमदार अभिमन्यू पवार, उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, सुरेश बिराजदार आदींशी संपर्क साधून चर्चा केली. महिलांनी भजन करत शासनाविरोधात आपला संताप व्यक्त केला.
यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलन तीव्र असल्याने जिल्हाधिकारी व वरिष्ठांशी बोलणे करून मुख्यमंत्र्यांनी बैठक लावण्याचे मान्य केले असल्याचे धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व्हाट्सअप वर पत्र पाठवून सांगितल्याने आंदोलन संपवण्यास शेतकऱ्यांनी सहमती दर्शवली.
यावेळी विनायकराव पाटील कवठेकर, विजयकुमार सोनवणे, नानाराव भोसले, माजी पंचायत समिती सदस्य हरीश डावरे, मलंग गुरुजी, कैलास शिंदे, कवठा येथील सरपंच विकास पाटील, संभाजी ब्रिगेड उमरगा तालुका अध्यक्ष अण्णासाहेब पवार, डॉ. किशोर घोटाळे, नरेंद्र पाटील एकोंडी, किल्लारीचे सुरज बाबळसुरे, रमेश पुजारी, भीमा उस्तुरे आदीची उपस्थित होती.
या आंदोलनात किल्लारी सह उमरगा, औसा, लोहारा व निलंगा तालुक्यांतील अनेक गावागावातून शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.




0 Comments