Hot Posts

6/recent/ticker-posts

कोकळगाव येथे डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती

  कोकळगाव येथे डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती





मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 


9822041174


निलंगा : आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र कोकळगाव येथे डेंग्यू दिनाच्या निमित्ताने गावातील नागरिकांना डेंग्यू आजाराची माहिती देऊन पत्रक वाटप करण्यात आले व सर्व नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्यात आले. तसेच डेंग्यू हा डासांपासून होणारा हा एक विषाणूजन्य आजार आहे त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन गावातील नागरिकांना करण्यात आले.

  ” डेंग्यू ” हा अतिशय गंभीर आजार आहे. दरवर्षी 16 मे हा दिवस ” डेंग्यू दिवस ” म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना डेंग्यू आजाराबद्दल माहिती व जनजागृती करणे हा आहे. तसेच गप्पी मासे हे डासांची आळी कशी खातात याबद्दलही माहिती दिली. गप्पी माशांमुळे डासांची घनता कशी कमी होते हे प्रात्यक्षिकाद्वारे गावातील नागरिकांना दाखवण्यात आले. गप्पी मासे कायमस्वरूपी व तात्पुरत्या डासोत्पत्ती स्थानामध्ये सोडल्यास डासांची निर्मिती नियंत्रणात राहते. सन 2025 या वर्षीचे घोष वाक्य ” Check, Clean, Cover: Steps to Defeat Dengue ” आहे. त्याचे मराठी भाषांतर ” तपासा, स्वच्छ करा आणि झाकून ठेवा : डेंग्यूला हरविण्याचे उपाय करा ” असे आहे.

  डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार हा ” एडिस इजिप्टाय ” नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी 8 दिवसापेक्षा जास्त दिवस साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालतात. त्यानंतर अंड्याचे रुपांतर आळीत व त्यानंतर डास तयार होतात. कोणतेही साठविलेले पाणी हे आठ दिवसांपेक्षा जास्त साठवून ठेवू नये. याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून डासाची उत्पत्ती कमी करुन नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेला जनतेचे सहकार्य आवश्यक आहे असे आवाहन डॉ.अभिजीत रुमणे, आरोग्य कर्मचारी श्री.राहुल भोसले, आरोग्यसेविका श्रीमती.सी.के जाधव यांनी केले.

Post a Comment

0 Comments