Advertisement

निसर्गाशी नाते जोडणारा वेळा अमावस्या उत्साहात साजरी

 निसर्गाशी नाते जोडणारा वेळा अमावस्या उत्साहात साजरी 



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174




लातूर : शेकडो वर्षांची परंपरा असलेला वेळा अमावस्या म्हणजेच येळवस हा सण शुक्रवारी लातूर जिल्ह्यातील अनेक गाव परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला.सणानिमित्त शेतकरी बांधवांनी आपापल्या शेतात जाऊन वनभोजनाचा आनंद घेतला. मार्गशीर्ष महिन्याची दर्शवेळा अमावास्या हा ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक आणि वन भोजनाचा आनंद देणारा सण आहे. ग्रामीण भागात येळवशीला शेतकरी व शेतीशी निगडित सर्व कुटुंबीय हजेरी लावतात. मित्र व नातेवाइकांना वनभोजनासाठी आमंत्रित केले जाते.शुक्रवार सकाळपासून शहरातून गावात येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर गर्दी दिसत होती. शहरात दिवसभर शुकशुकाट होता. शेतकऱ्यांनी सकाळी कडब्याची कोप करून पाच पांडवांची पूजा केली. तर सायंकाळी उत्तरपूजा केली जाते. त्यानंतर बालगोपाळांसह महिलांनीही येळवशीला भज्जी ,बाजरी कड्डक भाकरी, बाजरीचे उंडे ,खीर, धपाटे ,तिळाची पोळी, आंबील आदींसह रानमेव्याचा आस्वाद घेतला.

सर्व शिवार माणसांच्या वर्दळीने फुलून गेले होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत मनोभावी पूजा करण्यात मग्न होते. हर बोलो रे भगत राजो,  हर हर हर महादेव असा जयघोष होत होता. माणसाला निसर्गाजवळ घेऊन जाऊन त्यांचे निसर्गाशी घट्ट नाते विणणारा हा सण. सर्वत्र हिरवाळीने नटलेली वसुंधरा तूर आणि हरबऱ्याच्या फुलांत असलेला हरभरा, हवेचा तालावर नाचणारा गहू ,पाखरांना खुणावणारी पोटऱ्यातील ज्वारी असा चोहीकडे दिसणारा हिरवागार आणि प्रसन्न निसर्ग अशा वातावरणात ऊन, वारा, पाऊस या निसर्ग शक्ती समोर नतमस्तक होऊन केलेली ही पूजा म्हणजे शेतकरी व निसर्गाची शतकानुशतके चालत आलेली भागीदारी होय. असा दर्श वेळा अमावस्या सण मोठ्या उत्साहात ग्रामीण भागात साजरा करण्यात आला.



Post a Comment

0 Comments