अतिवृष्टी अनुदान तात्काळ शेतकऱ्याचे खात्यात जमा करावे व सोयाबीन खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा अन्यथा आंदोलन प्रा. मिरगाळे
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन पूर्णतः हातून गेले असून अनेक हेक्टर्सवरील जमिनीवरील माती वाहून गेली आहे. नव्याने शेती करणे शेतकऱ्यास आता अवघड झाले असून शेतकरी पूर्णतः कोलमडून गेला आहे. या आस्मानी संकटातून सावरत असतानाच शासनाने हेक्टरी 18 हजार पाचशे रुपये तीन हेक्टर पर्यंत मदत दिवाळीपूर्वीच आपणास मदत दिली जाईल असे जाहीर केले पण प्रत्यक्षात मात्र 50% शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप एक रुपयाही दिला गेला नाही. काही शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे रुपये प्रमाणे दोन हेक्टर पर्यंतच मदत केली गेली. रब्बी पेरणीसाठी दहा हजार जाहीर करून सुद्धा अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले गेले नाहीत. अतिवृष्टी अनुदानासोबतच रब्बी पेरणीसाठीचे अनुदान महसूल मंडळाच्या माध्यमातून न देता कृषी विभागाच्या नावाने शासनाने रब्बी पेरणीसाठीच्या अनुदानाचा जीआर कशामुळे काढला हे कळायला मार्ग नाही. तसेच पिकविमा म्हणून हेक्टरी 17 हजार रुपये मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. पिक विमा देण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे की पिक विमा कंपनीला हे कळायला मार्ग नाही. शेतकऱ्यांच्या जखमेवर हे सरकार मीठ चोळत असून अगोदरच निराश, हातात झालेला शेतकरी अशा खोट्या आश्वासनामुळे बळी पडत आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळत असून शेतकऱ्याशी यांचे काहीही देणे घेणे नाही. भांडवलशाही, उद्योगपती लोकांची कर्जमाफी करणे व शेतकऱ्याला देशोधडीला लावणे हे शासनाचे काम आहे का? शासनाने शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 5328 रुपये हमीभाव जाहीर केला पण प्रत्यक्षात कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला 3800 रु. दराने खरेदी केली जात आहे. शासनाचा हमीभाव व प्रत्यक्ष खरेदी यामधील फरक हा दीड हजाराचा असून कृषी उत्पन्न बाजार समितीत आजपर्यंत जेवढे सोयाबीन खरेदी केले आहे त्या प्रत्येक शेतकऱ्यांना फरकाची क्विंटलला दीड हजार रुपयेची रक्कम पावती प्रमाणे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी व सोयाबीन खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावेत. शासनाने अतिवृष्टी अनुदान व रब्बी पेरणीसाठी चे हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावेत तसेच सोयाबीन खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे अन्यथा शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा दिला आहे. सोबत निलंगा विधानसभा प्रमुख शिवाजी पांढरे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाप्रमुख लायकपाशा शेख, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख सविताताई पांढरे, उपतालुकाप्रमुख मंगलबाई कांबळे, उपतालुकाप्रमुख अरुणाताई माने, नागिनबाई सुरवसे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.



0 Comments