मसलगा पाटी येथे शेतकऱ्यांचे ‘चटणी-भाकरी आंदोलन’!
सरकार विरोधात संतप्त उद्रेक - आठ दिवसांत विमा अनुदान न मिळाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आज दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी निलंगा तालुक्यातील मसलगा पाटी येथे “चटणी-भाकरी आंदोलन” जोरदारपणे पार पडले. दिवाळी पाडव्याच्या दिवशी सण साजरा करण्याऐवजी, शेतकरी आपल्या हक्काच्या विमा अनुदानासाठी रस्त्यावर उतरले.
या आंदोलनात छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली मसलगा पाटी व परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला.
तुळशीदास साळुंखे म्हणाले,
“सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी! विमा हप्ता वेळेवर कापतात, पण जेव्हा भरपाई द्यायची वेळ येते तेव्हा शासनाचे अधिकारी गायब होतात. शेतकऱ्यांशी केलेली ही फसवणूक आम्ही आता सहन करणार नाही.”
शेतकरी प्रतिनिधी निर्मिती दास साळुंखे यांनी सांगितले,
“आम्ही दिवाळीचा सण विसरून चटणी-भाकरी खात आंदोलन करत आहोत, कारण हे सरकार आमचा सण, आमचा सन्मान आणि आमचा हक्क हिरावून घेत आहे. जर आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात विमा अनुदान जमा झाले नाही, तर तहसील कार्यालयासमोर उग्र आंदोलन उभं राहील.”
आंदोलनस्थळी संतापाची लाट
“शेतकरी एकता झिंदाबाद”, “फसवे सरकार हाय हाय”, “विमा अनुदान द्या – नाहीतर राजीनामा द्या” अशा घोषणांनी मसलगा पाटी परिसर दणाणून गेला. उपस्थित शेतकऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
शेतकऱ्यांचा प्रश्न अद्याप कायम
लातूर जिल्ह्यातील शेतकरी विमा अनुदान, पिकनुकसान भरपाई, वीजदर, व कर्जमाफीच्या प्रश्नांनी त्रस्त आहेत. शासनाच्या यंत्रणेने दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी आज न्याय मागत रस्त्यावर उतरला आहे.




0 Comments