लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी लातूर प्रशासन सज्ज
मुख्य संपादक: द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर :लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी बार्शी रोडवरील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथील मतमोजणी केंद्रात होणार आहे. यासाठी लातूर निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. या अनुषंगाने मतमोजणी केंद्रातील तयारी पूर्ण झाली असून या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. तसेच उमेदवार, उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेवून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर याबाबतची तपासणी करूनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्यासोबत 17 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मतमोजणीचे कामकाज पाहणार आहेत. तसेच मतमोजणीसाठी भारत निवडणूक आयोगाने मतमोजणी निरीक्षक म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील निरंजन कुमार आणि सागर चक्रबर्ती या दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून दोघेही लातूर येथे दाखल झाले आहेत. मतदान यंत्रातील (ईव्हीएम) मतमोजणी केंद्रावर प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आला असून प्रत्येक कक्षामध्ये 14 टेबलवर मतमोजणीची कार्यवाही होईल. तसेच टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून 10 टेबलवर टपाली मतमोजणी होईल.
सकाळी 8 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष टपाली मतमोजणीला सुरुवात होईल. त्यांनतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष संबंधित विधानसभा क्षेत्रातील मतदान यंत्रावरील मतमोजणीला सुरुवात होईल. प्रत्येक टेबलवर उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतमोजणी प्रतिनिधींना त्या टेबलवर कोणकोणत्या मतदान केंद्रावरील मतमोजणी होणार आहे, याबाबत माहिती देणारे फलक मतमोजणी कक्षात लावण्यात आले आहेत.
प्रत्येक टेबलवर एक मायक्रो ऑब्झर्व्हर म्हणजे सूक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई असे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक कक्षामध्ये दोन रो ऑफिसर राहतील. सैनिक मतदारांच्या मतपत्रिका छाननीसाठी स्थापित ईटीपीबीएमएस कक्ष, एनकोअर प्रणालीवर माहिती भरण्यासाठी स्थापित कक्ष, सर्व मतमोजणी कक्षातील फेरीनिहाय, उमेदवारनिहाय आकडेवारीची सारणी तयार करण्यासाठी स्थापित टॅब्युलेशन कक्ष आदी विविध कक्षात जवळपास 450 अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीनंतर ईव्हीएम आणि सांविधानिक व असांविधानिक लिफाफे सील करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय वेगवेगळी पथके गठीत करण्यात आली आहेत. सकाळी 6 वाजता सर्व अधिकारी, कर्मचारी मतमोजणी केंद्रात उपस्थित होणार आहेत.
मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेश करताना पोलिसांकडून प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार असून अधिकृत पास असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच प्रवेशद्वारापासूनच मतमोजणी प्रतिनिधी आणि मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जागोजागी दिशादर्शक फलक लावून मतमोजणी कक्षातील प्रवेशाबाबत माहिती देण्यात आली आहे.
अशा राहतील मतमोजणी फेऱ्या
मतदान यंत्रातील मतमोजणीसाठी लातूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सहा विधानसभा क्षेत्रनिहाय मतमोजणी फेऱ्यामध्ये सर्वाधिक 28 मतमोजणी फेऱ्या लातूर शहर विधानसभा मतदारसंघात होतील. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात 27, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात 26, निलंगा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात 25 आणि उदगीर व लोहा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात प्रत्येकी 24 मतमोजणी फेऱ्या होणार आहेत. तसेच टपाली मतमोजणीची 1 फेरी होणार आहे. एकूण लोकसभा मतदारसंघाचा विचार करता मतदान यंत्रातील मतमोजणीच्या 28 आणि टपाली मतमोजणीची 1 फेरी झाल्यानंतर अंतिम निकाल घोषित केला जाईल. मतदान यंत्रावरील प्रत्येक फेरीला अंदाजे 20 मिनिटे ते 30 मिनिटे लागण्याची शक्यता आहे.
मतमोजणी केंद्र परिसरात स्वतंत्र मिडिया सेंटर तयार करण्यात आले असून भारत निवडणूक आयोगाकडून प्राधिकरपत्र (पासेस) दिलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींना याठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. प्रत्येक फेरीचा उमेदवारनिहाय मतांची आकडेवारी याठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी दोन स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या पूर्वेकडील बाजूच्या प्रवेशद्वारातून प्रसारमाध्यम प्रतिनिधींना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच जनतेसाठी मतमोजणी केंद्राबाहेरील ध्वनिक्षेपकाद्वारे फेरीनिहाय उमेदवारांना मिळालेल्या मतांची माहिती दिली जाणार आहे.
मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू घेवून येण्यास मनाई
मतमोजणी केंद्रात मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप, आयपॅड, तसेच इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तु नेण्यास मनाई करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनासुध्दा केवळ मिडीया सेंटरमध्येच मोबाईलचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल मिडीया सेंटर येथे जमा करावा लागेल.
मतमोजणी केंद्र परिसरात तगडा बंदोबस्त
मतमोजणी केंद्राच्या परिसरात सुरक्षेच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. केंद्रीय राखील पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल आणि लातूर जिल्हा पोलीस आणि गृहरक्षक दलातील जवानांचा यामध्ये समावेश राहणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या नेतृत्वात 6 पोलीस उपाधीक्षक, 13 पोलीस निरीक्षक, 48 सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 460 पोलीस जवान, दंगा विरोधी दलाच्या 3 तुकड्या, शीघ्र कृती दलाची 1 तुकडी, गृहरक्षक दलाचे 300 जवान यांच्यासह राज्य राखीव पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस दलाची तुकडी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे.
मतमोजणी केंदाच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
लातूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 4 जून, 2024 रोजी शासकीय निवासी महिला तंत्र निकेतन, बार्शी रोड, लातूर येथे सकाळी 8 पासून सुरु होणार आहे. या मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात 4 जून 2024 रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या ठिकाणापासून 200 मीटरच्या परिसरामध्ये मंडपे, दुकाने उभारणे, तसेच मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपक व इतर सेट, ध्वनिक्षेपक व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधित पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामा व्यक्तीरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे.
0 Comments