Advertisement

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी युवकांनी प्रयत्न करावेत - भंते धम्मनाग

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी युवकांनी प्रयत्न करावेत - भंते धम्मनाग



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


लातूर : देशाचे भविष्य हे युवकांच्या हातात आहे, आणि त्या हातात जर आंबेडकरी विचारांची मशाल पेटलेली असेल, तर समाजाला कोणीही अंधारात ठेवू शकत नाही,” अशा प्रेरणादायी भावना व्यक्त करत पूज्य भंते धम्मनाग  यांनी युवकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी सज्ज होण्याचे आवाहन केले.

मौजे हालसी ता. निलंगा, जि. लातूर येथे आयोजित धम्म परिषदेच्या प्रमुख धम्मदेशने दरम्यान भंते धम्मनाग बोलत होते.

या कार्यक्रमाला परिसरातील बौद्ध उपासक, उपासिका कार्यकर्ते आणि  युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या धम्म परिषदेला पूजनीय भिक्खू धम्मनाग महाथेरो (हत्याळ), भिक्खू महावीरो थेरो (काळेगाव), भिक्खू पय्यानंद थेरो (महाविहार, लातूर), भिक्खू नागसेनबोधी थेरो (उदगीर), भिक्खू धम्मसार थेरो (किल्लारी) आणि भिक्खू सुमंगल थेरो (कराळी) यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक पूजनीय भिक्खू सुमेधजी नागसेन (बुद्ध लेणी, खरोसा)हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. आयु. इंजी. दत्ता नागनाथ सूर्यवंशी, मा. आयु. मधुकर श्रीपती सूर्यवंशी, मा. झुंबरभाऊ कल्याणी बनसोडे  मा.महानंदा दत्तात्रय बिराजदार  कासार सिरसी , मा आयु. दत्तात्रेय संभाजी कांबळे व मा. बसवंत त्र्यंबकराव पाटील उपस्थित होते.

यावेळी आपल्या प्रभावी धम्मदेशनेत भंते धम्मनाग म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना असा समाज हवा होता, जिथे प्रत्येक माणूस माणूस म्हणून जगेल. कुणी कुणाला कमी लेखणार नाही, अन्याय आणि विषमतेच्या बेड्यांत कोणी अडकणार नाही. अशा समाजनिर्मितीचे कार्य आज युवकांच्या खांद्यावर आहे.”

ते पुढे म्हणाले, “शिक्षण, प्रज्ञा, शील आणि करुणा  हे बाबासाहेबांनी दिलेले चार दीप युवकांच्या हातात तेजाने प्रज्वलित व्हायला हवेत. शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नव्हे, तर विचारांचा दीप आहे. बाबासाहेबांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मंत्र आजच्या पिढीने आयुष्याचा मार्ग बनवावा. समाजातील विषमता, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध उभे राहणे हीच बाबासाहेबांना खरी वंदना आहे.”

डिजिटल युगाचा संदर्भ देत भंते म्हणाले,

“आजच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांनी आंबेडकरी विचार, बौद्ध धम्म आणि मानवतेचा संदेश घराघरात पोहोचवावा. सोशल मीडियावर करुणा, शील आणि मानवतेचा आवाज उठवला, तर समाजात परिवर्तन घडवणे शक्य आहे.”

ते पुढे म्हणाले, “संस्कारक्षम समाज तयार करण्याची सुरुवात स्वतःपासूनच होते. आपल्या वागण्यात, बोलण्यात आणि विचारात जर बाबासाहेबांचे मूल्य असेल, तर परिवर्तन निश्चित आहे. युवकांनी स्वतः आदर्श घडवून समाजाला दिशा द्यावी  हीच खरी धम्मसेवा आहे.”

या धम्म परिषदेच्या अखेरीस सर्व उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याचा संकल्प केला.

“संस्कारक्षम, समतामूलक आणि मानवतावादी भारत” घडविण्याचा निर्धार प्रत्येकाच्या मनात दृढ झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्थानिक युवा उपास कांनी अत्यंत परिश्रम घेतले. त्यांच्या शिस्तबद्ध आयोजनामुळे परिषद सुरळीत पार पडली.

भंते धम्मनाग यांच्या प्रेरक विचारांनी उपस्थित युवकांच्या मनात आत्मविश्वास, प्रज्ञा आणि समाजसेवेची नवी ज्योत प्रज्वलित झाली.

Post a Comment

0 Comments