Hot Posts

6/recent/ticker-posts

अरे खोप्यामधी खोपा..ची ग्रामिण भागात येतेय प्रचिती! सुगरण पक्ष्यांची उन्हाळ्यात तयारी सुरू

अरे खोप्यामधी खोपा..ची ग्रामिण भागात येतेय प्रचिती! सुगरण पक्ष्यांची उन्हाळ्यात तयारी सुरू

छाया: बॉम्बे फोटो स्टुडिओ निलंगा 

मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9420010756



लातूर: उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी सर्व पक्षी घरटी तयार करतात. यात सर्वाधिक आकर्षक घरटे असते ते सुगरणीचे. मोठ्या कष्टातून आखीव व रेखीव कामातून पिल्लांसाठी तयार केलेले खोपे आकर्षण ठरत आहेत.

कवी बहिणाबाई चौधरी म्हणतात, ‘अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला’ या ओळीची प्रचिती या खोप्यांकडे पाहून येत आहे. 

पक्ष्यांना उन्हाळ्यात पावसाळ्यात, हिवाळ्यात उबदार घरट्यांची गरज असते. ग्रामीण भागात उंच बाभळी, लिंब व बोरीच्या झाडावर दिसणारे सुगरिणीचे सुंदर घरटे वाढत्या शहरीकरणामुळे नामशेष होत आहेत.

विज्ञान युगात प्रगती केलेल्या मानवाला हाताने अथवा यंत्राच्या साहाय्यानेही सुगरिणीच्या घरट्यासारखी वीण करता येणे अशक्य असते. त्यामुळे आता मानवानेदेखील आपल्या घराच्या सजावटीत या खोप्यांचा वापर करण्यास सुरवात केली आहे.

अशी असते रचना

काटेरी झाडांच्या फांदीला असलेले पक्ष्यांचे घरटे साधारणतः दीड ते दोन फूट उंचीचे असते. घरट्याच्या तळाशी प्रवेश करण्यासाठी जागा असते. आतमध्ये सहा ते आठ फूट इंच उंचावर गेल्यानंतर गोलाकार भागात अंडी घालण्यासाठी खोलगट भाग असतो.

त्याच ठिकाणी पिल्ले जन्माला येतात. खोलगट भागामुळे पिल्लांना उडता येईपर्यंत बाहेर पडता येत नाही. गवत काडीपासून तयार केलेला सुगरणीचा खोपा म्हणजे वीणकामांचा अद्वितीय नमुनाच असतो.

दुर्मिळ कला होतेय नामशेष

साधारण मार्च एप्रिल मध्ये सुगरण पक्षी घरटे तयार करतात. मध्यम, लहान आकाराचे, थव्यांनी राहणारे, लालसर पिवळ्या रंगाचे सुगरण व वीणकर पक्षी आखूड, जाडसर व टोकदार चोचीचे, तसेच लहान पायाचे असतात.

धान्य, फळे हे त्यांचे प्रमुख अन्न आहे. सद्यस्थितीत शेतशिवार ज्वारी, गहू ऊस आदीं हिरवाईने नटलेले आहे. ग्रामीण व शहरातील अनेक झाडांवर तयार केलेले हे खोपे पाहण्यासाठी चिमुकले  गर्दी करीत आहेत.

पक्ष्यांनी तयार केलेल्या या घरकुलाकडे कौतुकाने पाहत आहेत. दरम्यान, ग्रामीण भागासह शहरातील वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे सुगरण व वीणकर पक्षी स्थलांतर करू लागले आहेत.

शेत शिवारात दिसून येणारी सुंदर घरटी काही जण झाडांवरून काढून घराच्या सजावटीसाठी वापरत आहेत. मानवाच्या या अतिक्रमणामुळे निसर्गातील असामान्य दुर्मीळ कला कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाणथळ जागेची निवड

सुगरण पक्षी घरटे तयार करण्यासाठी विशेषत: पाणथळ ठिकाणची निवड करतो. नदी काठ, विहीरी, नाले आणि बंधाऱ्याशेजारील झाडांवर अशी घरटी प्रामुख्याने दिसून येतात.


Post a Comment

0 Comments